भेट कार्ड    
   
 

 

   
 
 
 

 

       
       
      आज तुला हे सांगायलाच हवं
       
       
       
       
   
 
   
   
  आज तुला हे सांगायलाच हवं
 
  आम्हीच पोसला तुझा अहम्
जागवला तुझ्यातला पुरुष तुला वाढवता वाढवता
रडलास कधी तर, `काय बायकांसारखं' म्हणून,
फ्रॉक घालायचा हट्ट कमी प्रतीचा मानून...
बघता बघता तुझं वडलांच्या खांद्याशी येणं
सुखावत राहिलं आम्हाला!
पण मग त्यांच्या सुरात सूर मिसळून
तू चेष्टा करू लागलास माझी
तेव्हा खटकलं मला
तरी समजून घेतलं, मनाआड केलं सारं... सवयीनं..!
पण लक्षात यायला लागली माझी चूक...

आज तुला हे सांगायलाच हवं...
तुझ्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होईल आता...

तू नाकारलीस एक मुलगी `पारंपरिक' म्हणून
पण दुसरीच्या बोलण्यातला
कर्तृत्वामुळे सहज आलेला आत्मविश्वासही
तुला `जरा जादाच' वाटला...
तुला हवीय नोकरी करणारी मुलगी
पण तुला घरही विस्कटलेलं आवडणार नाहीय.
पण बेटा, तुला आता बदलायलाच हवं....
जे मी शिकवायला हवं होतं तुला लहानपणीच
ते आता सांगतेय, माफ कर मला

तुला मिळेल तुला हवी तशी बायको
उभं राहील तुमचं घर
सुरू होईल तुमच्या आयुष्याचं नवं पर्व
नव्या नवलाईचे दिवस सरतील
आणि रूटीन सुरू होईल....

तेव्हा सारी कसरत तुला करावीच लागेल.
कधी होईल तिला घरी यायला उशीर
तेव्हा साभाळावं लागेल तुला घर
पाहुण्यांचं स्वागत, सामान आणणं, टापटीप...
मुलाची `आई'सुद्धा व्हावं लागेल....
हे तू करशीलही कदाचित वेळेची गरज म्हणून
पण जाणीवपूर्वक काढून टाक मनातून
मदतीची भावना
फक्त घर नव्हे, घरकामही दोघांचं असतं हे समजून घे
 

चालू...

 
कदाचित मिळेल तिला तुझ्या आधी प्रमोशन
तेव्हा मनापासून कर तिचं अभिनंदन
आणि तिच्या पाठीशी उभा राहा खंबीर
न दुखावता!
तिच्या राहण्या-वागण्यावर दाखवू नकोस स्वामित्व
तिला जगू दे स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुझ्यासारखंच
चुकलीच कधी तर समजून घे
वेळप्रसंगी हो कठोर, ठाम राहा
पण असू देऊ नकोस भावना अधिकाराची

तूही चुकशील कधी
तेव्हा खुलेपणानं मान्य कर आपली चूक
आड येऊ देऊ नकोस पुरुषी अहंकार
एकमेकांना सर्वार्थानं सोबत करत
एकमेकांच्या साक्षीनं वाढत राहा
आंतरिक विकासाचं अस्तर असू दे
तुमच्या लौकिक यशाला...

शिक्षणासाठी तू दूर गेलास
तेव्हा जाणवलं आपल्या नात्यातलं तुटलेपण
तरी माझं आईपण बांधलेलं होतं तुझ्या परत येण्याशी
आता
तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे....
तुझं मूलपण तुझ्या स्वाधीन करून
मी मोकळी होते आहे
आणि द्यायचं राहून गेलेलं
संस्कारांचं एक देणं तुझ्या शिदोरीत घालून
कर्तव्यमुक्त होते आहे....

शेवटी आणखी एक...
वडीलधारे म्हणून आमचा मान राख
असं मी तुला नाही म्हणणार
आता बदलल्या आहेत कल्पना नात्यांच्या
कळतंय मला
पण एका माणसानं दुसऱ्या माणसाशी वागावं
तसा तू वागशील आमच्याशी
एवढीच अपेक्षा!

तुझ्या गृहस्थाश्रमाच्या वाटेने सुरू होणाऱ्या
या नव्या प्रवासाला
आमच्या हार्दिक शुभेच्छा!
   
                   
 


Designed By HSMS