पुस्तके : मराठी    
   
 

 

       
 
 

नव्या पावलांनी सजे पुन्हा भुई
भेटे नवी राई नव्या जीवा..!

   

भेटे नवी राई

प्रकाशक : सुखायन प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : शशांक श्रीवास्तव
प्रथमावृत्ती : २१ मार्च २०२०
किंमत : २०० रुपये, पृष्ठे १४४
Amazon link : click to buy

           
   
 
   
   
निमिषाच्या अंतरावर दिसतो

ब्रह्मांडाच्या
अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म स्वरूपाच्या
केवळ शब्द-दर्शनानंही
समूळ हदरतं मन
'स्व' चा परीघ
सैरभैर होतो
त्वचेवर शहारा उमटतो खोल प्राणांमधून
पायांखालची जमीन सरकते
'घटाकाश'
घटाकारातून ओसंडू पाहते....
निमिषाच्या अंतरावर दिसतो
अव्दैताचा परीस स्पर्श...

पण
पण 'दर्शन' दृष्टिआड होताच
महाभरतीच्या या सगळ्या लाटा
माघारी वळतात
आणि मन
पूर्ववत गटांगळ्या खाऊ लागतं
स्व-भानाच्या खोल समुद्रात..!
***
 
मनोगत

आतमधे मळभ असतंच. काहीतरी साचत असतं.
रुजत असतं. उगवत असतं आतल्याआत.
पण अनेक पावसाळे भोगून झाल्यानंतर
रुजण्या-उगवण्याचे, फुलण्या-गळण्याचे नावीन्य ओसरते.
नकळत एक तटस्थ अवस्था येते.
किंवा मख्ख थकलेपण.
पिकलेली फळं पडतात आतल्याआत
पण ती उचलून कुणाला द्यावी-दाखवाविशी वाटत नाहीत
आतली स्वगतं निमूट पडून असतात..!
अचानक मरगळ वितळते...
चक्राकार गतीत फिरणार्‍या
त्याच त्या घटनांमध्ये ताजेपण जाणवतं.
तो क्षण स्वतःमधली नवी राई भेटवणारा असतो.
तिचं हिरवेपण लपेटून मळभही बोलू लागतं...
साचलेलं सगळं नव्या ऊर्जेसह उगवू लागतं...
आत निमूट पडून राहिलेली स्वगतं
मरगळीतून मुक्त होतात
तेव्हा त्यांच्याही नकळत
त्यांच्या कविता झालेल्या असतात..!
नव्या राईत भेटलेल्या नव्या कविता
इथे सादर करताना आनंद होतोय..!
***

   
                   
 


Designed By HSMS