पुस्तके : मराठी गद्य लेखन    
   
 

 

       
 
 

ईशावास्यमिदं सर्वं यत्किं च जगत्यां जगत्‍... ।
तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृधः कस्य स्विद्‍धनम्‍... ॥

   

ईशावास्यम् इदं सर्वम्...
एक आकलन-प्रवास


प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
आवृत्ती पहिली : जुलै २०१२,
किंमत : २०० रुपये, पृष्ठे १९४

           
   
 
   
   
ईशावास्य सारे  हे जे ‘आहे’ ते ते
जग जगातले  ईशावास्य
म्हणून, त्यागून  भोगावे हे पण
दुसर्‍याचे धन  इच्छू नये

कर्मे करीतच  व्हावे शतायुषी
इच्छा ही मनाशी  धरायची
पर्याय न काही  हाच मार्ग तुला
कर्म माणसाला  बांधते ना

आत्म्यातच सारी  पाहतो जो भूते
आणि भूतांमधे  पाही आत्मा
कधी तो कोणाला  नाही कंटाळत
नाहीच मानत  आपपर

एकत्वाचा ज्याला  नित्य अनुभव
त्याला काय मोह  कुठे शोक?

जे कोणी भजती  अविद्येला नित्य
घोर अंधारात  जातात ते
त्याहुनही घोर  अंधारात जाती
विद्येच्या भजनी  लागती जे

विद्या नि अविद्या  दोन्ही एकत्रित
जाणूनिया हित  साधतो जो
अविद्येने मृत्यु  ओलांडून जाई
विद्येने मिळवी  अमृतत्त्व..!
 
पुस्तकाच्या समारोप या प्रकरणामधून

‘ईशावास्यम्‍... इदं सर्वम्‍...' हे उपनिषद्‍कर्त्या ऋषींना प्रतीत झालेलं
अंतिम सत्य आहे काय? किंवा विश्वाच्या स्वरूपाविषयीचा हा अंतिम निष्कर्ष
आहे काय? याचं हो किंवा नाही असं एका शब्दात उत्तर देता येण्यासारखं
नाही.. सत्ताशास्त्र आणि आधुनिक मानसिकतेला समजणारं वैज्ञानिक सत्य कवेत
घेणारी, दीर्घ साधनेनंतरच्या प्रचितीला मिळालेली ही काव्यात्म अभिव्यक्ती
आहे! यातील ‘सत्य’ किंवा ‘निष्कर्ष’ सूचित करणारा आशय प्रत्येकानं आपला
आपण जाणून घ्यायचा आहे. शिवाय ‘ईशावास्य’सारखा विषय केवळ बुद्धीला समजणं
अभिप्रेत नाही तर ही समजूत आचरणात उतरणं.. आंतरिक परिवर्तन घडणं अपेक्षित
आहे... आणि ही प्रक्रिया न संपणारी आहे... त्यासाठी बौद्धिक आणि हार्दिक
‘संशोधन’ सतत चालू ठेवावं लागतं. या प्रक्रियेतला प्रत्येक टप्पा आधीच्या
समजुतीत भर घालत राहतो...
हे पुस्तक म्हणजे ‘ईशावास्यम्‍... इदं सर्वम्‍...’विषयीच्या माझ्या
आकलन-प्रवासात वाचकांना सामिल करून घेणं आहे...
सुरुवातीला आपण उपनिषदांची पार्श्वभूमी काय होती ते पाहिलं, उपनिषद या
शब्दाचा अर्थ समजून घेतला... ‘ईशावास्य’ची पूर्ण संहिता आणि तिचा सलग
स्थूल अर्थ पाहिला. मंत्रांची रचना, त्यांची आंतरिक सांगड, भाषाशैलीची
वैशिष्ट्ये पाहिली... या माहितीनं आपल्या आकलन-प्रवासाची दिशा ठरवली...
या उपनिषदातला एकेक शब्द म्हणजे एकेक व्यापक संकल्पना आहे. व्याकरणाच्या
आधारानं या संकल्पनांची दारं किलकिली करून आपण आत प्रवेश मिळवला. समोर
उलगडत जाणार्‍या आशयाचं पद्यरूपांतर हा या पुस्तकातील महत्त्वाचा भाग.
यातून आपण ‘ईशावास्य’चं अंतरंग-दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. यातील
प्रार्थना-स्वरूप असलेले शेवटचे चार मंत्रं अधिक अंतर्मुख करणारे आहेत.
वेगळा विचार करायला लावणारे आहेत. ‘ईशावास्य’मधील प्रार्थना’ या प्रकरणात
एक वेगळी अंतर्दृष्टी मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि ‘ईशावास्य’चा भव्य,
दूरस्थ वाटणारा आशय ‘आज’च्या आपल्या जगण्याशी कसा जोडता येईल?
याविषयीच्या मांडणीत जगण्याविषयीचं मार्गदर्शन करणार्‍या मंत्रांचा
खोलार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.
‘ईशावास्य’च्या अभ्यासादरम्यान हायडेग्गर, सार्त्र, फ्रिट्‍जॉफ काप्रा या
विचारवंतांची ‘ईशावास्य’च्या परिघाबाहेरची वाटणारी पुस्तकं वाचनात आली.
त्यातून मला वेगळ्या दर्शनबिंदूंमधूनही ‘ईशावास्य’कडे पाहता येईल हे
जाणवलं. मंदिरात प्रदक्षिणा घालताना प्रत्येक कोनातून मूर्तीचं वेगळं
आकलन होतं. तसा अनुभव या पुस्तकांनी मला दिला. भाग चारमधे आपण हे वेगळे
दृष्टीकोन थोड्या विस्तारानं समजून घेतले आणि ‘ईशावास्य’च्या आशयाशी
जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. जागोजागच्या तळटिपांमधून विषयाच्या
स्पष्टीकरणाबरोबर वेगवेगळ्या भागातील मजकुरांची एकमेकांशी सांगड
कशाप्रकारची आहे हेही समजून घेतलं.
मधल्या मधल्या रिकाम्या जागांसह हे सगळं सलग पुन्हा पुन्हा वाचायला हवं,
संदर्भग्रंथ मिळवायला हवेत... आपला स्वतःचा स्वतंत्र आकलन-प्रवास सुरू
व्हायला हवा.. अशी इच्छा या पुस्तकाच्या वाचनानं वाचकांच्या मनात निर्माण
होईल असा विश्वास मला वाटतो आहे...!
हे सर्व लिहून हातावेगळं करताना अत्यंतिक समाधनाच्या शेजारीच व्याकूळ
अस्वस्थता आहे. आकलनाचं बोट धरून बरंच चालल्याचं समाधान आहे आणि इतकं
चालूनही न पोचल्याची अस्वस्थ हुरहुरही... मनात येतंय—
‘असण्या’चं आदिम टोक शोधत
अस्तित्वा
तुझ्याकडे निघालीय खरी
पण
स्थळ-काळाच्या.. आज-इथेच्या
संधीवर
आपली चुकामूक
का होतेय एकसारखी?....
खरंतर
हा सापशिडीचा खेळ
यातली हार-जीत सवयीची झालीय..!
आणि शोधणं..सापडणं
पराभूत होणं म्हणजे तरी काय?
अनुभवणं याच जगण्यातले
असे जन्म-मृत्यू
ऋतुचक्रासारखे आळीपाळीनं येणारे...
मुक्काम नसलेला हा प्रवास
चालत राहणं हीच याची सांगता !
तुला काही नाव देऊन
सापडल्याच्या भ्रमात राहण्यापेक्षा
चालू राहूदे तुझं न सापडणं
आणि माझं शोधत राहणं
चालू राहू दे हा लपाछपीचा खेळ
सापडायचंच नाही
म्हणत तू लपलेला राहा
सापडणारही नाहीस म्हणत
मी शोधत राहीन
अखंड चालू राहू दे
शोध-यात्रा...

   
                   
 


Designed By HSMS