पुस्तके : अनुवादित    
   
 

 

       
 
 

ममा - पित्ती के नाम

   

लम्हा लम्हा
(दीप्ति नवल यांच्या 'लम्हा लम्हा' या हिन्दी कवितासंग्रहाचा अनुवाद)

प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, मुंबई.
मुखपृष्ठ : सरदार जाधव
संस्करण - प्रथम : जुलै २०१४
किंमत : १०० रुपये, पृष्ठसंख्या ९६

           
   
 
   
   
कुणास ठाऊक केव्हापासून

कुणास ठाऊक केव्हापासून
प्रारंभापासूनच बहुधा
ही रेलगाडी धावते आहे उगाच..!
मळकट डब्यांवर
क्षणांची पुटं चढत राहतात.
एखाद्या थांब्यावर कधी कुणी चढतो
एखाद्या अंधार्यार डब्यात काही काळ बसतो
कधी कुणी चुपचाप उतरुन जातो एकटाच
एखाद्या निर्जन स्टेशनवर..!

असंख्य हातांचे ठसे उमटलेत इथं
कितीतरी पावलांचे कळकट डाग..!
या आदिम रेल्वेमध्ये
थांबत मात्र कुणीच नाही
कुणीही नाही !
रात्रं-दिवस अशीच धावत असते ही
अवजड रुळांवरून एकाच लयीत
कोणजाणे कुठवर..!

समोरच्या आरशावर धुळीच्या मागे
एक अस्पष्ट प्रतिबिंब आहे...
स्वतःला इथं पाहून
सुन्न झाले आहे!

हा कसला प्रवास?
कुठं निघालीय मी?
***
 
प्रस्तावना

दीप्तिच्या कविता वाचल्यावर लगेच लक्षात येतं की, दीप्ति एक चांगली कवयित्री आहे आणि भविष्यात श्रेष्ठ कवयित्री होण्याची क्षमता तिच्यात आहे. नुसत्या कविता वाचून जर कोणी कवयित्रीचं व्यक्तित्व समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला वाटेल की कवयित्री नेहमी आजारी असते, उदास राहते, अशक्त असेल, किंवा एखाद्या दीर्घ आजारातून उठलेली आहे. परंतू मी तिला जवळून ओळखतो आणि म्हणून सांगू शकतो की दीप्तिचं व्यक्तित्व याच्या अगदी उलट प्रकारचं आहे. तिचं आरोग्य चांगलं आहे, ती नेहमी आनंदी, उत्साही असते, ती जीवनावर प्रेम करणारी आहे, महत्त्वाकांक्षी आहे आणि कधी उदास झालीच तर ती हसण्या-खेळण्याचा आनंद घ्यावा तसाच उदासीचाही आनंद घेते! आनंदी, उत्साही असणं हा तिच्या व्यक्तित्वाचा पैलू तिच्या कवितांमध्ये कुठे दिसत नाही. तिची स्वप्नाळू वृत्तीच जवळजवळ प्रत्येक कवितेत तरलपणे व्यक्त होते. तिच्या कविता वाचताना तिची दोन्ही रुपं मी पाहू शकतो. मला नेहमी जाणवत राहिलं आहे की एक दीप्ति स्वत:तील दुसर्‍या एका दीप्तिला स्वतःपासून वेगळी करून अलिप्तपणे पाहाते आहे. कॅमेर्‍याचा फोकस हळूहळू अ‍ॅडजस्ट झाल्यावर जशी एकच एक प्रतिमा व्यवस्थित पकडता येते तसं या कविता वाचताना दीप्तिची ‘स्वप्नं’ हळूहळू फोकस मधे येतात आणि वास्तव वाटू लागतात.
दीप्तिच्या कवितांतील शब्दांची निवड आणि त्यांचा योग्य उपयोग ही तिच्या कवितांची विशेषता आहे. तिने वापरलेल्या प्रतिमा अतिशय नाजूक आणि पारदर्शी आहेत.

उदा.-
.....विझलेल्या स्वप्नांच्या धुरानं
कोंदून गेलंय आकाश...
.....जेव्हा खूप काही सांगायचं मनात असतं ना
तेव्हा काहीच सांगावसं वाटत नाही ! 
.....‘कांगडी’मधे अजून थोडी धग बाकी आहे
आणि आसपास कुणीही नाही !

ईश्वर करो आणि तिची लेखणी सतत लिहिती राहो !

- गुलजार
   
                   
 


Designed By HSMS