पुस्तके : मराठी    
   
 

 

       
 
 

असंख्यांपैकी
मी
एक दर्शनबिंदू
हे ज्यांनी मला शिकवलं
त्या पुस्तकांना

   

मी एक दर्शनबिंदू

प्रकाशक : सुमती प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : शाम भुतकर, पुणे
आवृत्ती पहिली : २५ डिसेंबर १९९९
किंमत : ९० रुपये, पृष्ठे १४४

           
   
 
   
   
रोज....

रोज सकाळी
मी तयार होऊन बाहेर पडते
रस्त्याच्या या बाजूला उभी राहते
मला पलीकडे जायचे असते
मला मुक्कामी नेणारी गाडी गाठायची असते
अखंड वाहता रस्ता
त्वचेखालील कल्लोळांसारखा
त्यावर कुणी सिग्नल्स बसवलेले नाहीत
मला पलीकडे नेणारी
एकही फट दिसत नाही
मी जागच्या जागी
वाहणाऱ्या गर्दीत हेलपाटत राहते
आणि निजल्या निजल्या
भयंकर स्वप्नांचा थकवा यावा
तशी थकून रस्त्याच्या अलीकडूनच घरी परत येते...
कितीतरी दिवस झाले
रोज कुठेच न पोचता परततेय
रोज नव्या उमेदीने तयार होऊन
बाहेर पडतेय
आणि
स्वत: दुभंगून
वसुदेवाला वाट करून देणाऱ्या
यमुनेची गोष्ट आठवत
रोज रस्त्याच्या या बाजूला उभी राहतेय !
 
मनोगत

अंगावर आदळणारी गर्दी आणि रक्तात ठाण मांडून बसलेला भूतकाळ, आतले घडवणारे चढउतार आणि भोवतीचे अगतिक व्यवहार, हरतऱ्हेचे अटळ प्रदूषण आणि जगावे लागणे, न सुटणारे चिरंतन प्रश्न आणि ईश्वर कल्पना, शहरांचा असह्य वेग आणि रुटीनचा चक्रव्यूह, संवाद मनाशी, माणसांशी, झाडांशी, पुस्तकांशी...आणि एकाकीपण, आत्मशोध आणि हरवलेपण, निसर्गातले मोह पाडत दूर नेणारे सौंदर्य आणि निसटत्या आनंदाचे क्षण...अशा कितीतरी घटकांनी आयुष्य भरत...सांडत राहते! जगताना त्या त्या वेळी उमटलेल्या भावनिक प्रतिक्रिया म्हणजे या संग्रहातल्या कविता. `लाहो' नंतरच्या ४-५ वर्षांच्या कालावधीतल्या या कविता आहेत. डायरीत ज्या क्रमाने लिहिल्या गेल्या त्या क्रमानेच त्या संग्रहात घेतल्या आहेत. एखाद्या लांबच्या प्रवासाच्या फोटोंचा अल्बम असावा तशा. माझ्या खिडकीतून टिपलेल्या.!

यातल्या दोन काहीशा दीर्घ कवितांचा आशय मनात सतत रेंगाळत राहिलेला आहे. प्रश्नांचे काहूर माजवून उत्तराच्या दिशेने नेणारा हा आशय जाणीस्रोतातून इतर कवितांतही झिरपलेला आहे.

असंख्यांपैकी मी एक दर्शनबिंदू हे विविध पुस्तकांच्या वाचनातून, त्या संदर्भात झालेल्या संवादांतून मला उमगले. आकलनाविषयीचे आकलन अधिक स्पष्ट झाले. या मधल्या काळात थोडे जाणीवपूर्वक शिस्तीने वाचन झाले. या संदर्भात झालेल्या संवादाने एकूण साहित्याविषयीची आणि जगण्याविषयीची माझी समजूत वाढली.

यासाठी मनोगत लिहिताना मला पहिल्या संग्रहाच्या शेवटी लिहिलेल्या ओळी आठवतायत... ``सारी आवराआवर करून परततच हाते मी कुंपणापर्यंतची आपली धाव सरली म्हणून ! पण मृगजळासारखं माझं कुंपण आणखी थोडं दूर गेलंय...!'' आंतरिक मर्यादांच्या पार होण्याचा लाहो तेव्हापासून मनात होताच. म्हणूनच प्रत्येक वळणावरचे `कुंपण' दूर सरकत राहिलेय. उमेद वाढवणाऱ्या सर्वांसह जगताना आवराआवरीची वेळ येईल तेव्हाही एवढेतरी टप्पे ओलांडून शकले हा दिलासा असेल आणि सर्वांविषयीची कृतज्ञताही !

   
                   
 


Designed By HSMS