पुस्तके : अनुवादित    
   
 

 

       
 
 

अधिक चांगली कविता
लिहिल तोच
जो अधिक चांगला कवी असेल

जेव्हा तो लिहित असेल
सर्वात चांगली कविता
नक्कीच तो त्यावेळी
सर्वात चांगला माणूस असेल

ज्या जगात लिहिल्या जातील
अधिक चांगल्या कविता
तेच असेल अधिक चांगलं जग

शब्द आणि अर्थ म्हणजे कविता नाही
सर्वात सुंदर स्वप्न आहे
सर्वात चांगल्या माणसाचं..!

   

तरीही काही बाकी राहील
(डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा अनुवाद)

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ : रविमुकुल
संस्करण - प्रथम : मार्च २०१४
किंमत : १५० रुपये, पृष्ठसंख्या १२०

           
   
 
   
   
तरीही काही बाकी राहील!

'तरीही काही बाकी राहील

चिता पेटली आहे
आणि जळतं आहे स्मशान

पण मी तुम्हाला सांगतो
तरीही काही बाकी राहील

काय राहील
हे मला माहीत नाही
किती राहील
याचा अंदाज तुम्ही स्वतः करा
का राहील
हा एक निरर्थक प्रश्न आहे

मी फक्त इतकंच जाणतो
की काहीतरी राहील

तुम्हाला खात्री आहे काय
की जगण्याच्या इच्छा मरून जातील
झरून जातील श्रद्धा
सुकून जातील स्वप्नं
व्यर्थ होऊन जातील शब्द

तुम्हाला खात्री आहे काय
की आग सगळं काही जाळून टाकू शकते
सगळं काही सुकवू शकते हवा
पाणी सगळं काही विरघळवू शकतं
सर्व काही नष्ट करू शकतं ब्रह्मास्त्र ?

नाही, निश्चित काही बाकी राहील
कुठे आणि कसं आणि किती ?

हे तर तेच सांगेल
जे राहील..!'
***
 
डॉ. तिवारी यांचे मनोगत

आपल्याच कवितेबद्दल भाष्य करणं मला फारसं सयुक्तिक वाटत नाही. कविता ही कविला आपल्या संततीसारखीच असते, म्हणूनच तीतल्या कमतरतेबद्दल जाणीव असूनही त्याची चर्चा तो करू शकत नाही. आणि हा खरं तर कवितेच्या वाचक-रसिकांचा प्रांत आहे. तरीही मी एवढं मात्र नक्कीच म्हणेन, की माझ्या कवितेमध्ये माझ्या काळातलं वास्तवही आहे आणि माझी वेदनाही. माझं विश्व जसं मी पाहिलं, अनुभवलं, त्याच पद्धतीनं मी ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः मी त्यांना माझे शब्द देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांना सहज व्यक्त होणं अवघड होऊन बसलंय; उदाहरणार्थ : स्त्री, तान्ही मुलं, शेतकरी आणि पशु-पक्षी. माझे शब्द सहज समजून येतील असे आणि अर्थसंपन्न व्हावेत हाही माझा प्रयत्न होताच. वर्तमानातल्या अवघ्या भयावहतेव्यतिरिक्तही ह्या जगात मूल्यवान असे काही निश्चितच टिकून राहील, असा एक कवी म्हणून माझा विश्वास आहे. कवी आणि कविता या दोहोंचंही हेच उद्दिष्ट असलं पाहिजे.

कविता ही कवीचं परम भाष्य असतं असं म्हटलं जातं. माझ्या कविता माराठी वाचकांपुढे जात आहेत याचा मला अतिशय आनंद आहे. सहृदय आणि सुसंस्कृत मराठी काव्यरसिक-वाचकांना जर ह्या कविता आवडल्या तर माझी अभिव्यक्ती सार्थक झाली असं मी समजेन.

विश्वनाथ प्रसाद तिवारी

   
                   
 


Designed By HSMS