पुस्तके : मराठी    
   
 

 

       
 
 

व्यक्त-अव्यक्ताच्या
मध्यसीमेवरील
सर्जनोत्सुक शब्दांना-

   

व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ व आतील सजावट : चंद्रमोहन कुलकर्णी, पुणे
आवृत्ती पहिली : मे २०१६
किंमत : १५० रुपये, पृष्ठे १३६

           
   
 
   
   
मनाचं शांतवन होईपर्यंत..!!

मन मोर असतं तेव्हा
नृत्याला पदन्यास शिकवतात
शब्द
स्वरांना ताल देतात
आणि आशयाला लय...
मोराबरोबर
साद घालतात पावसाला
अंगण माखून टाकतात
मृदगंधानं
आणि स्वतः पिसारा बनून
थिरकत राहतात
मनाची तृप्ती होईपर्यंत..!

मात्र रिकाम्या मनात
घालतात धिंगाणा
दणाणून सोडतात
आतलं आकाश
खणत बसतात भूतकाळ
आणि डोकावत राहतात
विवरांमधल्या अंधारात
कडाडतात विजेसारखे
आतल्या आत
नि मग स्वतःच बरसत राहतात
डोळ्यांमधून धुवांधार
मनाचं शांतवन होईपर्यंत..!!
 
मनोगत

'उत्तरार्ध' हा माझा कवितासंग्रह २००८ साली प्रकाशित झाला. त्यानंतर गेल्या काही वर्षात कवितेपेक्षा कवितेविषयीच अधिक लिहिलं गेलं.. कविता लिहिता लिहिता कवितेचं स्वरूप आणि तिचं सामर्थ्य उमगत जातं. कवितेशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत हे आकलन अधिक स्पष्ट होत जातं. मग कवितेइतक्याच उत्कटतेनं कवितेविषयीच्या या आकलनाविषयीही बोलावसं.. लिहावसं वाटू लागतं... कुणीतरी म्हटलं आहे की कवितेविषयी अधिक बोलणं हे कविता-लेखन कमी होण्याचं चिन्ह आहे..! ते खरं असावं कारण कवितेचं सामर्थ्य लक्षात येत जातं तेव्हाच आपल्या मर्यादाही जाणवत जातात. लक्षात येतं की कविता लिहिणं हे किती जोखमीचं काम आहे ! मग स्वाभाविकपणे लिहिण्यावर आपल्याकडूनच अंकुश ठेवला जातो..

तरी 'उत्तरार्धा'नंतरही रुजवण होतच राहिली... केव्हातरी अनाहूतपणे सुचलेल्या कविता अधुन मधून लिहून ठेवत होते. विविध अंकांमधून त्या प्रकाशित होत होत्या. त्या कविता आता संग्रहरूपात एकत्र केल्या आहेत.

कविता 'कवी'चं नाव सोबत बाळगत असली तरी लिहून हातावेगळी झाल्यावर ती एका खोल अर्थानं कवीची राहात नाही.. फार काय ती त्यातल्या शब्दांचीही राहात नाही. कवी-मनातून बाहेर पडून शब्दांच्या रंगमंचावर कविता एकदा सादर झाली आणि पडदा पडला की पडलाच..! तिची नाळ तुटते. ती स्व-तंत्र होते. मुक्त होते कवीनं दिलेल्या आकारातून. रसिकवाचक जेव्हा त्या कवितेचा आस्वाद घेतो तेव्हा ती पुन्हा साकारते रसिक-मनात. तो तिचा नवा जन्म असतो!

कवितेचे हे जन्म.. विलय.. नवे जन्म म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ..! ती या जगड्व्याळात असतेही आणि नसतेही. व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर अवचित कधीतरी कवीला दिसते आणि शब्दात प्रकाशित झाल्यावर रसिकालाही दिसू लागते..! मला दिसलेल्या काही कविता इथे सादर करतेय रसिकमनात पुन्हा जिवंत व्हाव्यात म्हणून, प्रतिसादाच्या अपेक्षेत..!

   
                   
 


Designed By HSMS